५० हजाराची लाच स्वीकारतांना एसडीपीओच्या रायटर व अंगरक्षकाला अटक

0
148

चंद्रपूर दि 01–राजुरा उपविभागीय कार्यालयातील एसडीपीओ राजा पवार यांचे रायटर व अंगरक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एसडीपीओ कार्यालय बाहेरील चहा टपरीवर रंगेहात अटक करण्यात आली.

रायटर राजेश त्रिलोकवार (५१) व अंगरक्षक सुधांशू मडावी (३६) असे अटकेतील पोलिसांचे नाव आहे. तक्रारकर्त्याला दारूची वाहतूक करताना राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या प्रकरणात मदत करण्यासाठी एसडीपीओचे रायटर त्रिलोकवार व अंगरक्षक मडावी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्याने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत विभागाकडे केली. पथकाने सापळा रचून शुकवारी एसडीपीओ कार्यालयाच्या बाहेरील चाय टपरीवर दोघांना लाच घेताना रंगेहात अटक केली. यांच्या वाहनातून सुमारे अडीच लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे.

ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक वर्षा मते, ना. पो. शि अनिल बाहरे, अमोल मेघरे, विकास गडपायले आदींनी केली.