
गडचिरोली दि १० मे- शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पक्षी कुक्कुटपालन योजने अंतर्गत २ लाख २५ हजाराचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी १० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या चामोर्शी पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाच्या (एसबी) पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. डॉ.सागर पोपट डुकरे (३२) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्यास पक्षी कुक्कुटपालन अंतर्गत २ लाख २५ हजाराचे अनुदान मंजूर करून देण्याकरिता आरोपीने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबतची तक्रार गडचिरोली एसीबीकडे केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला व १० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला रंगेहाथ पकडले असून त्याचेवर लाच प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, श्रीधर भोसले, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, नथ्यू धोटे, राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, संदीप घोरमोडे, ज्योत्स्ना वसाके, स्वप्नील वड्ढेटीवार यांनी केली. पुढील तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड करीत आहेत.