लाच मागणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीसह तिघांवर गुन्हा

0
66

अमरावती,दि.३१ (प्रतिनिधी): नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ग्राम पंचायतीचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या महिला सरपंच, तिचा पती व अन्य एका व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेसखेडा येथील सरपंच महिला त्यांचे पती दिनेश व गजानन हरीश्चंद्र महल्ले (३८) असे लाच प्रकरणात गुन्हा दाखल होवून कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणातील तक्रारकर्ता बांधकाम कंत्राटदार असून त्यांना जिल्हामृद व जलसंधारण कार्यालयाकडून बेसखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम मिळाले होते. सदर काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंच महिला, तिचा पती दिनेश आणि गजानन महल्ले यांच्या मार्फत कंत्राटदाराला कामाच्या एकूण रकमेच्या तीन टक्क्यानुसार ६० हजार रुपये लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २६ मे रोजी प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर त्याच दिवशी एसीबीने पडताळणी केली. तेव्हा सरपंच महिलेचा पती दिनेश आणि गजानन महल्ले या दोघांनी कामाच्या रकमेच्या ५ टक्यांप्रमाणे १ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे आणि ती स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. आरोपी दिनेश आणि गजानन महल्ले यांनी कंत्राटदाराला रक्कम घेऊन बेसखेडा येथे बोलावले. परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र एसबीच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली.