गडचिरोली : विविध नक्षल कारवायांसह पेनगुंडा येथील निरपराध ईसमाच्या खून प्रकरणात सहभाग असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना गडचिरोली पोलिसांनी ९ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्याच्या हद्दितील जंगल परीसरात अटक केली. यामुळे २०२२ पासून पोलीस दलाने अटक केलेल्या नक्षल्यांची संख्या ८१ झाली आहे.
शासनाने जाहिर केले होते 10 लाख रुपयांचे बक्षीस
ॲक्शन टिम कमांडर रवि मुरा पल्लो (३३), भामरागड दलम सदस्य दोबा कोरके वड्डे (३१) दोन्ही रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली अशी अटक केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. शासनाने त्यांच्यावर १० लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.उपविभाग भामरागड अंतर्गत धोडराज पोलीस ठाणे हद्दीतील जंगल परिसरामध्ये प्राणहिताचे विशेष अभियान पथक नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना दोन संशयित व्यक्ती घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनंतर त्यांची अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सांगितली. या दोघांचा नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात धोडराज पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्हात अटक करण्यात आली.