तिरोडा,दि.13 : भंडारा येथून तिरोडा येथे आपल्या कर्तव्यावर रूजू होण्यासाठी निघालेल्या एका पोलिस हवालदाराच्या गाडीला एसटीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना राजीव गांधी चौकात आज (दि.13) रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली.
मृत पोलिस हवालदाराचे नाव दुलीचंद गोंदू बरबैया (वय 49) राहणार भंडारा असे आहे.
सविस्तर असे की, पोलीस हवालदार दुलीचंद गोंदुजी बरवैया हे सन 2016 पासून तिरोडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ते पोलीस स्टेशन तिरोडावरून कर्तव्याकरिता मागील 3 महिन्यापासून बिरसी विमानतळ गोंदिया येथे होते. ते मूळ गावी भंडारावरून कर्तव्यावर येत असताना आज सोमवार, 13 जून 22 रोजी सकाळी 11.15 वाजताच्या सुमारास राजीव गांधी चौक भंडारा येथे त्यांच्या मोटरसायकलला एसटी बस ने धडक दिली. त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे.
पोलीस हवालदार दुलीचंद गोंदुजी बरवैया यांच्या अपघाती मृत्यूमुळे तिरोडा पोलीस ठाण्यात शोक व्यक्त केला जात आहे.