केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ; हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे : नाना पटोले

0
23

*राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबई, नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा*

मुंबई, दि.१३ जून :: केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनियाजी व राहुलजी गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून दडपशाही करणा-या केंद्र सरकारविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, आ. अमर राजूरकर, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दिकी, आ. संग्राम थोपटे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, उत्कर्षा रुपवते, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूरतही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आमदार विकास ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल देशमुख, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, सोशल मिडीयाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, उत्तर भारतीय संघाचे प्रदेशाध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करत आहे पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. जनता सरकारनेही इंदिराजी गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती, आता भाजपा सरकार तेच करत आहे पण अहंकारी, अत्याचारी भाजपा सरकारसमोर काँग्रेस कदापी झुकणार नाही.