
कृषी निविष्ठा भरारी पथकाची कामगिरी
अकोला दि.16– अकोला एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीच्या ब्रॅंडच्या नावाने बनावट खत तयार करणाऱ्या एका कंपनीवर कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय भरारी पथकाने कारवाई करुन 20 लाख 5 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला श्रीमती रोहिणी मोघाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवार दि.15 रोजी एम.आय.डी.सी अकोला येथील एम,आर. फर्निचरच्या बाजूला असलेल्या गोडावून मध्ये भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मारल्यावर सोडीयम सल्फेट (प्रत्येकी 50 किलो याप्रमाणे) 135 बॅग, हायब्रीड सुमो ग्रॅन्युएल 170 बकेट, इमल्सिफायर लिक्विड 14 प्लास्टीक टाक्या (2800 लिटर एकूण), निमसीडस कर्नल ऑईल (2050 लिटर),रासायनिक खत 0.52.34 (एकूण 400 किलो), किटकनाशक बाटल्या 40 नग इ. व यंत्रसामुग्री इत्यादी साहित्य आढळले. या साहित्याची किंमत 20 लाख 5 हजार 730 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या साहित्याच्या आधारे याठिकाणी शासनाच्या व शेतकऱ्यांच्या फसवणूकीच्या उद्देशाने जैवउत्तेजक उत्पादने विक्रीचे प्रमाणपत्र असतांना नामवंत कंपनीच्या रासायनिक खताच्या बॅगचा वापर करुन अवैधरित्या बनावट रासायनिक खत उत्पादन करीत असल्याचे आढळले. याबाबत राहुल नामदेव सरोदे (36) रा. गांधीनगर पोस्ट ऑफिसजवळ चांदूर अकोला या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा भरारी पथक तसेच तालुकास्तरीय भरारी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केली. पथक प्रमुख डॉ. मुरली इंगळे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गोपाळ दिगंबर जाधव, जिल्हास्तरीय भरारी पथक सचिव तथा मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला श्रीमती रोहिणी मोघाड, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, ग्राम विकास अधिकारी पंकज जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कर्मचारी यांनी केली.