जेवनातून विषबाधा; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

0
38
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा-एकत्रित जेवन केल्यानंतर अन्नातून विषबाधा होऊन एका १२ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आईवडिल आणि लहान भाऊ अस्वस्थ आहेत. ही घटना भंडारा तालुक्यातील माडगी (टेकेपार) येथे घडली.
परमानंद फुलचंद मेर्शाम (१५) रा. माडगी असे मृतकाचे नाव असून तो १0 व्या वर्गाचा विद्यार्थी होता. गंभीर असलेले फुलचंद मेर्शाम यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दुर्गा आणि चेतन (१0) यांच्यावर लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास मेर्शाम कुटूंबियांनी जेवन केले. जेवनात लाल भाजी असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सोमवारी सकाळी चवळीची भाजी खाल्ली. दरम्यान सर्वांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गुंथारा क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य कांचन होमराज वरठे यांच्या मदतीने चौघांनाही लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, परमानंद याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी १0 च्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लाखनीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे परमानंदचे वडील फुलचंद यांची मंगळवारी दुपारी प्रकृती खालावल्याने त्यांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी दुर्गा आणि लहान मुलगा चेतन यांच्यावर लाखनीत उपचार सुरू आहे.
वैद्यकीय अधिकार्‍यांनी जेवनात वापरलेले पाणी आणि भाजीचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.