मनी लॉन्ड्रिंगच्या नावावर मित्राला १२ लाखांनी गंडविले

0
35

भंडारा-दिल्ली एअरपोर्टवर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात फसल्याची थाप मारुन दिल्ली येथील भामट्याने भंडारा येथील मित्राकडून १२ लाख ६९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
२४ मे रोजी भंडारा येथील राजेश कुमार सिंग (४२) यांना त्यांचा मित्र अनिकेत गुप्ते रा. दिल्ली याने फोन केला. दिल्ली एयरपोर्ट येथे माझ्याकडे २ लाख पौंडचा चेक असल्यामुळे एयरपोर्ट इमिग्रेशन ऑफिसर यांनी मला पकडले असून एयरपोर्ट नियमानुसार ती किंमत जास्त असल्याने मनी लॉन्ड्रिंगची केस होईल. त्यामुळे चेक क्लिअर करण्यासाठी पैशाची गरज आहे, अशी बतावणी केली. राजेश यांना विश्‍वास बसावा म्हणून त्याने एयरपोर्ट इमिग्रेश ऑफिसर सुमन विवेक, फॉरेन्स करंसी एक्सचेंज ऑफीसर तन्वी खुराणा, रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड बँक मॅनेजर संतोष मारीसन, मॉरीया टेरेसा यांच्याशी वेगवेगळ्या मोबाईलवरुन बोलणी करुन दिली. तेव्हा त्या अधिकार्‍यांनी तुम्ही पैसे दिल्यानंतर आम्ही अनिकेत गुप्ते याला सोडू, असे आश्‍वासन राजेश कुमार सिंग यांना दिले. त्यानंतर अनिकेतने फॉरेन करंसी एक्सचेंजच्या नावाने पैसे मागितले व राजेश यांच्या नावाने रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड दिल्ली येथील शाखेत खाते काढले. त्यानंतर राजेश यांनी भंडारा येथील अँक्सीस बँक खात्यातून नेट बँकींग मार्फत २४ ते २७ मे या कालावधीत टप्याटप्याने एकूण १0 लाख ५४ हजार रुपये घातले. त्यानंतर आई प्रभावती सिंग यांच्या खात्यातूनही पैसे जमा करण्यात आले. असे एकूण १२ लाख ६९ हजार रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर पुन्हा ७ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने राजेश कुमार सिंग यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
याप्रकरणी राजेश यांचे वडील कन्हैया मुखलाल सिंग यांच्या तक्रारीवरुन अनिकेत गुप्ते (३३), सुमन विवेक (३१), तन्वी खुराणा (४0), संतोष मारीसन (३८), मॉरीया टेरेसा (३५) सर्व रा.दिल्ली यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नागरजोगे करीत आहेत.