वाळू तस्करांचा महसूल अधिकार्‍यांवर हल्ला

0
40

पवनी- वाळू तस्करांकडून थेट उपविभागीय अधिकार्‍यांवर हल्ला केल्याने चर्चेत आलेल्या पवनी तालुक्यात पुन्हा एकदा वाळू तस्करांनी महसूल अधिकार्‍यांवर हल्ला केला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात वाळू तस्कर अधिकच शिरजोर झाल्याचे चित्र आहे. ही घटना शुक्रवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील खातखेडा घाटावर घडली.
खातखेडा वाळू घाटावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती खातखेडा/शेडीचे तलाठी कचरु बहुरे यांना मिळाली. त्यांनी सहकारी तलाठी यू. व्ही. निंबार्ते यांना घेऊन खातखेडा येथील वाळू घाटावर चौकशीकरिता गेले. तेव्हा वाळू घाटातून रेती भरून घाटाच्या रस्त्याने जात असताना ट्रक थांबवून चालकाला रॉयल्टीची मागणी करताच दोन्ही ट्रकचे चालक ट्रक सोडून पसार झाले. तलाठय़ांनी ट्रकची पाहणी केली असता प्रत्येकी सहा ब्रास वाळू ट्रकमध्ये भरून असल्याचे आढळून आले. ट्रकला चावी लागली असल्याने चावी काढून स्वत:जवळ ठेवून घेतली.
वाळू भरलेले ट्रक पकडल्याच्या काही क्षणात आरोपी मिथुन नामक आरोपी स्वत:चे गाडीने येऊन तलाठी बहुरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तलाठी बहुरे यांच्या छातीवर मारुन हातातील ट्रकची चावी हिसकावून ट्रकमधील वाळू तिथेच रिकामी करून पसार झाला. त्याचवेळी ब्रेझा कारमधून अनोळखी व्यक्ती आला. त्यानेही तलाठी यू. व्ही. निंबार्ते यांचेशी बाचाबाची करून त्यांचे हातातील ट्रकची चावी हिसकावून घेत ट्रकमधील वाळू तिथेच रिकामी करून पसार झाला.
याप्रकरणी पवनी पोलिसात आरोपी मिथुन (वय ३४), दोन्ही ट्रकचे चालक, मालक व ब्रेझा गाडीतून आलेल्या अनोळखी इसमाविरोधात भादंवि ३५३, ३२३, ३७९, ५0४, ५0६,३४ महाराष्ट्र जमीन महसूल कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, यातील आरोपी फरार असल्याची माहिती आहे. पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत