
गोंदिया-‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या उद्देशातंर्गत नदी-नाल्यांवर कोल्हापुरी बंधार्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र बंधार्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्षाने चोरट्यांची चांदी होत आहे. पांगोली नदीवर गोंदिया शहर शिवारातील एका बंधार्याचे चक्क नऊ लोखंडी दार चोरीस गेले आहेत. या प्रकारापासून संबंधित विभाग मात्र अनभिज्ञच आहे. त्यामुळेच अद्यापपर्यंत या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही. चोरीस गेलेले गेट ४५00 किलो ग्रॅम वजनाचे असावे, असा अंदाज आहे.
‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या उद्देशाने नदी, नाल्यावर बंधार्यांचे बांधकाम केले जाते. यातून सिंचनाची सोय, पाणी टंचाईवर मात करता यावे. तसेच जलस्तर वाढावा, हे मुख्य उद्देश आहे. मात्र, या उद्देशाला संबंधित विभागाचा उदासिन कारभार हरताळ फासत आहे. असे बंधार्यांच्या दुरवस्थेवरून पहावयास मिळत आहे. गोरेगाव तालुक्यातून उगम झालेल्या पांगोली नदीच्या उत्थानाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाले आहे. लुप्त होत चालेल्या पांगोली नदीच्या उत्थानाला घेऊन खुद्द संबंधित विभाग देखील उदासिनता दाखवित आहे. त्यातल्यात्यात बंधार्यांची देखभाल दुरूस्तीचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे. गोंदिया शहर शिवारातील पांगोली नदीवर बांधलेल्या एका बंधार्याचे चक्क ९ गेट चोरीस गेले आहेत. चोरीस गेलेला एक गेट जवळपास ५00 किलोग्रॅम वजनाचे होते. त्यामुळे ९ गेट ४५00 किलोग्रॅम वजनाचे असावे, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, या चोरीच्या घटनेची अद्यापही संबधित विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. किंबहुना पोलिस तक्रार करण्यात आली नाही. म्हणजे, विभाग या घटनेपासून अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.