
चंद्रपूर-स्थानिक गुन्हे शाखेने नकली भेसळयुक्त दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. छाप्याच्या वेळी बिट्टू कंजर नामक व्यक्ती बनावटी दारू तयार करताना आढळला. मात्र धाड पडल्याचे लक्षात येताच आरोपी बिट्टू कंजर याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. पोलिसांच्या झडतीत रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या बाटल्यांचे तोडलेले बुच, १८0 मिलीच्या रिकाम्या बाटल्या, बाटल्या सीलबंद करण्यासाठी बनावट झाकणे, बुच व बाटली सिल करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, ऑफिसर्स चॉईस कंपनीच्या ९0 मिली क्षमतेच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, मध्य प्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या या कंपनीच्या ९0 मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या एकूण २९५ नग प्लास्टिक बॉटल, रॉयल स्टॅग कंपनीच्या जुन्या १८0 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नवीन झाकण व बुच लावून असलेल्या एकूण ३६ बाटल्या, जुन्या बॉटलचे बूच तोडण्याकरिता वापरण्यात येणारे एक कटर, बनावट दारू बॉटलमध्ये भरण्याकरिता वापरण्यात येणारी एक प्लास्टिकचे नरसाळे, ५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या दोन कॅन भरून भेसळ करण्याकरिता वापरण्यात येणारा उग्रवास येत असलेले पाण्यासारखे दिसणारे द्रव्य, एका ५ लिटरच्या कॅन मध्ये भेसळ केलेले लालसर उग्रवास येत असलेले द्रव्य असा एकूण ३१९२५/- रू. चा बनावट दारू बनविण्याकरिता वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यावरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरूच असून, मागील काही काळापासून जिल्ह्यात अवैध नकली दारूनिर्मिती सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील मुल तालुक्यात दोन वेगवेगळया ठिकाणी धाड घालून आबकारी विभागाने मिथ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती कारखाने उद्ध्वस्त केले होते. या घटनेची शाई वाळते ना वाळते तर चक्क जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर शहरातील जलनगर परिसरातील कंजर मोहल्यात स्थानिक गुन्हे शाखेने धाड घालून भेसळयुक्त विदेशी मद्यसाठा तसेच भेसळ करण्याकरिता वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त केले आहे.
कंजर मोहल्ल्यातील रवींद्र उर्फ बिट्टू कंजर हा मध्यप्रदेशमधील दारू महाराष्ट्रात आणून त्यात अमली व उग्रवासाचे पदार्थ मिसळवून नकली दारू बनवून ती रॉयल स्टॅग व ऑफिसर्स चॉईसच्या बाटल्यांमध्ये भरून भेसळ केलेली अवैध दारू विक्री केल्या जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या आधारावर पोलिसांनी छापा टाकला. आरोपी रविंद्र ऊर्फ बिट्टु रणधीर कंजर, (वय २५) रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड चंद्रपूर विरुद्ध पोलिस स्टेशन रामनगर अपराध क. ४१५/२0२३ कलम ४२0, ३२८ भादंवि सह कलम ६५ (अ), ६५ (ब), ६५(ड), ६५(ई), ६५ (फ), ६७. ६७(१)(अ), ६७ (क). १0८ महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम ६३ प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, पोलिस अंमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे, चंद्रशेखर आसुटकर यांनी केली.