Home गुन्हेवार्ता बोगस किटकनाशक उत्पादक साठवणूक व विकी करणाऱ्या चार आरोपींवर गुन्हा दाखल

बोगस किटकनाशक उत्पादक साठवणूक व विकी करणाऱ्या चार आरोपींवर गुन्हा दाखल

0

गोंदिया, दि.27 :– जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते. किड व रोग व्यवस्थापन उपाययोजना करण्याकरीता शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात किटकनाशकाचा वापर करीत असतात. संशयित क्लोरोफाईरीफॉस 10 टक्के जि.आर. व्यापारी नाव फोराटॉप्स या किटकनाशकाचा नमूना वाय.बी.बावनकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी घेऊन किटकनाशक प्रयोगशाळा येथे तपासणीकरीता पाठविले असता तपासणीअंती सक्रीय घटक 10 टक्के जि.आर. अपेक्षित असतांना शुन्य टक्के आढळून आले. किटकनाशक उत्पादक रामश्री केमिकल्स मुंबई या कंपनीकडे राज्याचे उत्पादन/विक्री परवाना नसून सुध्दा विनापरवाना राज्यात किटकनाशक विक्री करीत होते. सक्रीय घटक शुन्य असलेले बोगस (बनावट) किटकनाशक उत्पादन व विनापरवाना विक्री केल्याने रामश्री केमिकल्स मुंबई तसेच बालाजी कृषि केंद्र ता.सेलु जि.वर्धा, अष्टविनायक ॲग्रो एजन्सी वर्धा, आई कृषि केंद्र भिवखिडकी ता.अर्जुनी/मोरगाव जि.गोंदिया चे प्रोपायटर ईश्वरदास कापगते असे एकूण चार आरोपी यांनी संगमताने बोगस किटकनाशक साठवणूक, विक्री व विक्री बंद आदेश दिलेले किटकनाशकाची परस्पर विल्हेवाट लावल्याने शेतकरी व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 420, 34 किटकनाशक कायदा 1968 कलम 3,9,13,17,18,29 व किटकनाशक नियम 1971  नियम क्र.9,16,17,18,19,30,31 अन्वये नवेगावबांध ता.अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशन जि.गोंदिया येथे FIR क्र.0044 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सदर कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जि.प.कृषि विकास अधिकारी एम.के.मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण  निरीक्षक यसलव बावनकर यांच्या फिर्यादीवरुन करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये विस्तार अधिकारी डी.के.रामटेके, पं.स.अर्जुनी/मोरगाव यांनी सहकार्य केले.

        शेतकऱ्यांनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावे व त्याचे पक्के बिल विक्रेत्यांकडून घ्यावे. जे कृषि केंद्रधारक बियाणे, खते व किटकनाशके कायद्याचे पालन करणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल व त्यांचे कृषि निविष्ठा परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

Exit mobile version