सोंटूच्या पैशांसाठी गोंदियात ‘गोलमाल’, लॉकरमधील रकमेला फुटले पाय

0
6

गोंदिया : ऑनलाइन बेटिंगच्या माध्यमातून नागपुरातील व्यापाऱ्याची ५८ कोटींनी फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैन याच्या लॉकरमधील पैशांना पाय फुटल्याचे दिसून आले. पोलिसांची कारवाई होण्याअगोदरच बॅंकेच्या व्यवस्थापकाच्या मदतीने त्याच्या डॉक्टर मित्राच्या लॉकरमध्ये पूर्ण रोख व दागिने हलविण्यात आले. नागपूर पोलिसांना सोंटूच्या चौकशीदरम्यान ही बाब कळली आणि पोलिसांनी तातडीने गोंदियातधाड टाकत डॉ. गौरव बग्गा याच्या घरून १.३४ कोटी रोख व ३.२०० किलो सोने जप्त केले. पोलिसांनी डॉ. बग्गा याला अटक केली आहे.
सोंटूच्या मित्राकडे मोठ्या प्रमाणावर रोकड व दागिने असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर रात्रीच नागपूर पोलिसांचे पथक गोंदियाकडे निघाले. नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजतापासून गोंदियात कारवाईला सुरुवात केली. गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रेडीओलॉजिस्ट म्हणून कार्यरत डॉ. गौरव बग्गा याच्या घरी धाड टाकण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी १ कोटी ३४ लाख रुपये रोख व ३ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे जप्त केली. गोंदियात सोंटूच्या आणखी काही परिचितांकडेदेखील धाड टाकण्यात आली. दिवसभर धाडसत्र चालवून डॉ. गौरव बग्गा याच्या घराची झडती घेण्यात आली. पोलिसांनी बग्गाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. बग्गा हा गंगाबाई रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

बॅंक व्यवस्थापक खंडेलवालची मोठी भूमिका
सोंटू जैन याने बनावट ॲपच्या माध्यमातून अनेकांना गंडविले व कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली. अगदी ‘डी’ कंपनीच्या लोकांशीदेखील त्याची ‘लिंक’ होती. २२ जुलैला पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकून १७ कोटींची रोख, १४ किलो सोने व २९४ किलो चांदी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चार बँक लॉकरची झडती घेतली. लॉकरमधूनही पोलिसांनी ८५ लाख व साडेचार कोटींचे सोने जप्त केले होते. अटक टाळण्यासाठी सोंटूने खूप प्रयत्न केले व हायकोर्टाने जामीन नाकारल्यावर त्याने पळ काढला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर त्याने या आठवड्यात आत्मसमर्पण केले. पोलिस चौकशीदरम्यान सोंटूने लॉकरमधील रोकड व दागिने हलविल्याची माहिती समोर आली. यात ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल याची मोठी भूमिका होती. त्याने डॉ. गौरव बग्गा व गरीमा बग्गा यांच्या लॉकरमध्ये सोंटूच्या लॉकरमधील पैसे हलवले. पोलिसांनी खंडेलवालच्या घराचीदेखील झडती घेतली. मात्र, तेथे काही आढळले नाही. त्यानंतर बँकेत त्याला नेऊन चौकशी करण्यात आली.

सोंटूच्या आई, भाऊ, वहिनीविरोधातही गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणात सोंटू जैनसह त्याची आई कुसुमदेवी नवरतन जैन, भाऊ धीरज उर्फ मोंटू जैन, वहिनी श्रद्धा धीरज जैन यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनीदेखील जुलैत पोलिस कारवाई सुरू असताना व्यवस्थापक खंडेलवालच्या मदतीने त्यांच्या लॉकरमधील पैसे व सोने हलविले होते. त्यांनी खंडेलवाल व डॉक्टरला लॉकरच्या चाव्या दिल्या होत्या.