कणकवली पोलीस व तहसीलदार यांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

0
6
file photo

अचानक झालेल्या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले

कणकवली :-मागील काही दिवस अवैध वाळू वाहतुकीबाबाबत तक्रारी वाढत चालल्या होत्या. पोलिसांसोबत आता तहसीलदार देखील ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आचरा तोंडवली कालावल खाडीतून वाळू भरून कणकवली आचरा किनई रस्त्याने रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करत असताना पोलिसांच्या गस्त घालत असलेल्या पथकाला आढळून आला. सदरील डंपरचा नंबर ( एम एच ०८ बीए ९१९९ ) असून सुधिर नानासो माने ( रा. बाज ता. जत जि. सांगली, सध्या रा. रत्नागिरी ) असे त्या डंपर चालकाचे नाव आहे. याबाबत त्याला पोलिसांच्या पथकाने विचारणा केली असता त्याने आपल्याजवळ वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. दरम्यान त्याच्या ताब्यातील डंपर हा पोलिसांनी मागे वळवत कणकवली पोलीस ठाण्यात नेऊन लावला व सदरील घटनेबाबत तहसीलदार यांना कल्पना दिली.

माहिती मिळताच कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे व महसूलचे पथक दाखल होत पुढील कारवाई करून डंपर ताब्यात घेतला. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार व त्यांच्या पथकाने अजून चार डंपरवर कारवाई केली आहे.या कारवाईत महसूलचे पथक सहभागी झाले होते. ताब्यात घेतलेले डंपर कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत.

ही कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पो. कॉ. किरण मेथे, राहुल राऊत, शैलेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली. मात्र अचानक सुरू झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र ही एक काळाची गरजच होती अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.