
नागपूर : मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर ती वारंवार पैशाची मागणी करीत होती. त्यामुळे कंटाळलेल्या युवकाने महिलेचा गळा आवळून खून केला. मित्राच्या मदतीने मृतदेह कन्हान नदीत फेकला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्याकांडाचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली. सुनील उसरबर्से (२२) आणि त्याचा मित्र आर्यन महतो (२०) दोन्ही रा. कपिल नगर अशी आरोपींची नावे आहेत. शीतल उकरे (४२) असे मृतक महिलेचे नाव आहे.आरोपी सुनील उसरबर्से आणि मित्र आर्यन महतो हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून मागील चार वर्षांपासून ते जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दत राहतात. सुनील अविवाहित असून १४ वर्षांच्या लहान भावासोबत राहतो. सुनील साफसफाईचे काम करतो. मिळकत भक्कम आणि खर्च कमी असल्याने सुनीलकडे चांगली रक्कम असायची. शीतल ही टाईल्सच्या दुकानात काम करायची. तिला पती आणि दोन मुली आहेत. पती एका खासगी कंपनीत काम करतो. लहान मुलगी ११वीला तर मोठी मुलगी बीए प्रथम वर्षाला शिकते. शितलचा पती आणि सुनील चांगले मित्र आहेत. शीतल काम करीत असलेल्या दुकानात सुनील अधून मधून् साफाईसाठी जात होता. त्यामुळे दोघांचीही चांगली ओळख होती. तसेच पती सोबत मैत्री असल्याने घरी ये-जा होती. यातूनच त्यांच्यात अनैतिक संबध निर्माण झाले. पती कामावर गेल्यानंतर दोघांचीही घरी भेट होती.