उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीला वर्धा पोलिसांनी घेतले ताब्यात

0
42

वर्धा : शेतकऱ्यांच्या नावे बोगस बँक खाते सुरू करून २ कोटी ६४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वर्धेच्या तत्कालीन भू-संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पसार झाल्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पोलिसांनी त्यांना हिंगोली येथील एका फार्म हाऊसमधून ताब्यात घेतले.यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या परभणी व हिंगोली येथील निवासस्थानी धडक देत तपास केला. मात्र त्या आढळून आल्या नव्हत्या. पोलीस सतत शोध घेत होते. या प्रकरणात धरपकड सूरू झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तीन वेळा तारखा दिल्या. मात्र, सुनावणी होण्यापूर्वीच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. वर्धेत आणल्यानंतर त्यांची अधिक चौकशी होणार आहे. यापूर्वी एजेंट म्हणून काम करणारे निशांत किटे, प्रफुल्ल देवढे, नितीन कुथे, आकाश सुरेश शहकार तसेच नितीन येसाणकर यांना अटक करण्यात आली आहे.