
भंडारा : घरची कामे आटोपून गावालगतच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवार १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोथली /धर्मापुरी येथे घडली. आई सुषमा उर्फ विद्या विजय मेश्राम (३९) तर मुलगी दिव्या विजय मेश्राम वय (१६) अशी मृतक मयलेकिंची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार , उन्हाळी पिकाकरीता गावालगतच्या नाल्यात पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे गावातील महिला या नाल्यावरच रोज कपडे धुण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे मृतक आई व मुलगी देखील कपडे धुवायला नाल्यावर गेल्या होत्या. मृतक दिव्या हिच्या हातातील टॉवेल पाण्यात वाहून जात असल्याने ती टॉवेल पकडण्यासाठी पुढं सरसावली, मात्र नाल्यापासून काही अंतरावर वनराई बंधारा असल्यामुळे त्या ठिकाणच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दिव्या पाण्यात बुडू लागली.मुलगी बुडत असल्याचे पाहून आईने धाव घेतली. मात्र खोल पाणी व पाण्यावर वाढलेले गवती वनस्पती यामुळे ती सुद्धा खोल पाण्यात बुडून माई-लेकीचा दुर्दैवी अंत झाला. त्याच वेळी कपडे धूत असलेल्या दोन महिलांनी ह्या घटनेची माहिती तात्काळ गावात येऊन सांगितली. सदर घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना मिळताच ठाणेदार धंदर त्यांच्या चमू सोबत घटनास्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांचे मदतीने दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढून, शव विच्छेदनासाठी लाखांदूरला पाठविले असून, पुढील तपास दिघोरी पोलीस करीत आहेत. ह्या घटनेमुळे बोथली/धर्मापुरी गावासह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.