Home गुन्हेवार्ता कत्तलखान्यात नेणार्या २१ जनावरांची रावणवाडी पोलिसांनी केली सुटका

कत्तलखान्यात नेणार्या २१ जनावरांची रावणवाडी पोलिसांनी केली सुटका

0

गोंदिया,दि.31: कत्तलखान्यात नेण्यासाठी कोंबून ठेवलेल्या जनावरांचे वाहन पोलिसांनी पकडले असून त्यातील २१ जनावरांची सुटका करण्यात आली. रावणवाडी पोलिसांनी ग्राम चंगेरा येथे रात्री ८ वाजेदरम्यान ही कारवाई केली.
जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी वाहन क्रमांक एमएच ३७-टी ३११४ मध्ये २१ जनावरांना चारापाणी न देता त्यांचे पाय बांधून दाटीवाटीने वाहनात डांबून नेण्याच्या तयारीत असताना पोलिस शिपाई नरेंद्र मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड घालून वाहन पकडले. वाहनात बघितले असता त्यात २१ जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले. या प्रकरणात पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीचे वाहन, तर दोन लाख १० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त केला. तसेच, आरोपी फिरोज खान रशीद खान (५२, रा. सेलूबाजार, जि. वाशिम), राजीक सफी कनोज (२७, रा. बाजारटोला-काटी) व जितेंद्र हरिलाल अंबुले (२९, रा. बाजारटोला-काटी) या तिघांवर २९ मार्च रोजी रावणवाडी पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११, १, (ड) सहकलम ५ अ, ९ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बघेले करीत आहेत.

– या प्रकरणातील आरोपींनी बाजारटोला येथील रविशंकर तोफसिंग तुरकर (२८) व थानसिंग तोफसिंग तुरकर (२३) या दोघा भावंडांना पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेत २८ मार्च रोजी रात्री १० वाजता बाजारटोला येथे शिवीगाळ करीत काठी व दगडाने मारून जखमी केले. या घटनेत प्रतिउत्तर म्हणून अल्ताफ सफिक कानुज (२४, रा. बाजारटोला) यालाही आरोपी रविशंकर तुरकर व थानसिंग तुरकर यांनी धक्काबुक्की करीत दगडाने मारहाण केली. या दोन्ही गटांतील लोकांवर रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३२४,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version