
अकोला,दि.२९-अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास ह्या नकली नोटा चालवल्या जात असून ह्यामागे फार मोठे रॅकेट कार्यरत असल्याने त्याचा शोध घेणे स्थानिक पोलिसांना एक प्रकारे आव्हानच आहे.मूर्तिजापूर हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने देशभरातील अवैध धंदे करणाऱ्यांना या शहराची माहिती असू शकते तर ट्रक चालकांच्या माध्यमातून नकली नोटांचा हा गोरख धंदा या मार्गावरील ढाबे व किरकोळ व्यावसायिकांच्या माध्यमातून चालवल्या जात असल्याची शंका आहे.पोलिसांनी या दृष्टीने संबंधित लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी शोधल्यास नक्कीच हे रॅकेट पोलिसांच्या हाती लागू शकते
गेल्या काही दिवसांपूर्वी व्हीसी ५२६०५२ या क्रमांकाची १०० रुपयांची व ४ सीवी ८३५०११ या क्रमांकाच्या ५० रुपयांच्या नोटा येथील अपर्णा मेडिकलचे संचालक डॉ.जगदीश कडू यांच्याकडे आढळून आल्या तर दुसरी ५०० रुपयाची नोट किराणा व्यवसायी गोरख मोरे यांना प्राप्त झाली. हुबेहुब खऱ्या नोटे सारख्या दिसणाऱ्या आणि त्यावर नोटेचा नंबर व भारतीय रिजर्व बैंक असे अंकीत केलेल्या या सर्व नोटा आहेत. या नोटा महिलांकडून चलनात आणल्या जात असल्याचे संबंधितांचे म्हणणे असून तसे सीसीटीशी चित्रीकरणही समोर आले आहे. सदर महिला चेहऱ्यावर रुमाल अथवा स्कार्फ बांधून दुकानात गर्दी बघून या नकली नोटा चालवित असून असे प्रकार यापूर्वीसुध्दा घडल्याने या मागे नकली नोटा चलनात आणणारे रॅकेट महिलांकडून चालविल्या जात असल्याची शंका आहे.
ही नकली नोट हातात घेऊन बारकाईने निरीक्षण केले असता, नोटेचा कागद दर्जाहीन असून पारदर्शक भागातील महात्मा गांधीचे चित्र गायब आहे. त्याचबरोबर नोटेमध्ये भारत, इंडिया लिहिलेली चमकदार तार सुद्धा दिसून येत नाही. या नकली नोटा खऱ्या नोटात मिसळून सफाईदारपणे किंवा गर्दीच्यावेळी चलनात आणल्या जात असल्याने नागरिकांत व व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.