निर्दयी बापाने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना फेकले नदीत;दोघींचा मृत्यू; निर्दयी बापाला अटक

0
255

अकोला:-अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाळापुर येथे एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदी शेजारी गर्दी केली होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून रात्री शोध कार्य घेतल्यावर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

आलिया परवीन आणि सदफ परवीन असे, या दोघी मृत बहिणींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात ७ आणि ५ वर्षीय बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिस तपास घेत होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे एकाने पूलावरून नदीत दोन महिलांना फेकून दिले. त्यानंतर भीमकुंड नदीत शनिवारी पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान रात्री उशिरा दोघींचे मृतदेह पोलिसांना सापडले. दरम्यान, दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून निर्दयी बापाला अटक करण्यात आली आहे.

शेख हरून याला चार मुली आहेत. कोणता विचार किंवा कुठला वाद उफाळून आला याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. सध्या पोलीस कारणाचा तपास करत आहेत. चार मुलींपैकी त्याने आलिया परवीन व सदफ परवीन या दोघींना बाळापूर जवळ असलेल्या भीमकुंड नदीपात्रात फेकून दिले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर संशय येऊ नये म्हणून त्याने मुली हरवल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. मात्र पोलिसांना संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतले, पोलीसी खाक्या दाखवताच निर्दयी बापाने मुलींना नदीत फेकल्याची कबुली दिली.