इसापूर खामखुरा दरम्यान अज्ञात वाहनाने मोपेडला चिरडले
अर्जुनी मोर.-प्रकृती बरी नसल्याने इटखेडा येथे डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या मायलेकीच्या मोपेडला अज्ञात वाहनाने धडक दिली.यात दोघींचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८ वाजताचे सुमारास वडसा कोहमारा राज्य महामार्गावर खामखुरा गावानजीक घडली.मायलेकीच्या मृत्यूने खामखुरा गावात शोककळा पसरली आहे. मृतकाची नावे दिपाली अनिल डोंगरवार (३३व) खामखुरा व निर्मला योगराज कापगते (६०) मुरमाडी ता लाखांदूर अशी आहेत.
प्रकृती बरी नसल्याने दोघी मायलेकी नजीकच्या इटखेडा येथील एका खाजगी डॉक्टरकडे खामखुरा येथून मोपेडने सोमवारी रात्री निघाल्या.उपचार घेतल्यानंतर त्या खामखुरा येथे जाण्यासाठी परत निघाल्या. वडसा- कोहमारा राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोपेडला धडक दिली. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन पळून गेले.यात दोघी मायलेकिंचा मृत्यू झाला. अनिलकुमार तेजराम डोंगरवार (४१) खामखुरा याचे फिर्यादीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ भारतीय न्यायसंहिता, सह कलम १८४,१३४ मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहनकर हे करत आहेत.