नागपूर : उपराजधानीत शेखू टोळी आणि हिरणवार टोळीमध्ये खुनी संघर्ष पेटला आहे. गुरुवारी शेवटी शेखू टोळीने तीन दुचाकींनी हिरणवार टोळीच्या कारचा फिल्मीस्टाईल पाठलाग करुन खापरखेड्याजवळ (लोनखैरी) कार अडवली. यावेळी आरोपींनी अंधाधुंद गोळीबार करून कुख्यात पवन हिरणवारची हत्या केली. तर हल्ल्यात पवनचा भाऊ बंटी हिरणवार आणि एक अन्य साथिदार गंभीर जखमी झाले.
या गोळीबार कांडामुळे शहरात पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून शेखू टोळी आणि पवन हिरणवार टोळीमध्ये वैर आहे. हिरणवार टोळीने शेखूच्या लहान भावाची शंकरनगर चौकात हत्या केली होती. त्यामुळे शेखूचा भाऊ सरोज खानला हिरणवार बंधूचा ‘गेम’ करायचा होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनतो हिरणवार बंधूच्या मागावर होते.
गुरुवारी दुपारी पवन हिरणवार-बंटी हिरणवार हे दोघेही तीन साथिदारांसह बाबुळखेड्यातील पंचमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी सिट्रोईन कारने गेले होते. यावेळी कारमध्ये त्यांच्यासोबत मित्र सोनू शेंद्रे, हिमांशू हेमंत गजभिये, सिद्धार्थ कोवे सर्व रा. काचीपुरा नागपूर हे बसले होते. दरम्यान, पवन आणि बंटी एकाच कारमध्ये असल्याची माहिती सरोज खानला मिळाली. तो हा आपल्या पाच साथिदारासह तीन दुचाकींनी पवनच्या मागावर निघाला, तर तो हल्ला करणार याबाबत अनभिज्ञ असलेला पवन हा देवदर्शन करुन कारने सुसाट परत येत होता.
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोनखैरी रस्त्यावर शेखूच्या टोळीने पवनच्या कारचा पाठलाग करणे सुरु केले. पवनची कार दिसताच शेखूच्या भावाच्या टोळीने पवनच्या कारवर अंधाधुंद गोळीबार केला. तर दोन दुचाकीस्वार आरोपींनी पवन हिरणवारवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. तर कारमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या बंटीवरही आरोपींनी गोळीबार केला. मात्र, त्यात बंटी थोडक्यात वाचला.गोळीबार होत असल्यामुळे चालकाने कार थांबवली. आरोपींनी चाकूनेही एका युवकावर हल्ला केला.
तर कारमधील दोन युवकांनी शेखू टोळीवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे सरोज खानने पळ काढला. झटापटीत सरोजच्या भावाच्या हातातील पिस्तूल घटनास्थळावर पडली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात फिरत आहे.
कारागृहातून बाहेर येताच झाला ‘गेम’
कुख्यात शेखूची शंकरनगर नागपूर येथे पेट्रोलपंपजवळ हत्या करण्यात आली होती. शेखू हत्या प्रकरणात मृतक पवन हिरणवार हा आरोपी होता. नुकताच तो कारागृहातून सुटून बाहेर आला होता. दुसरीकडे, भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेखूचा भाऊ सरोज खान हा मृतक पवन याच्यावर पाळत ठेवून होता.
तो टिप देणारा कोण?
शहरातील गुन्हेगारांच्या काही टोळ्यावर राजकीय वरदहस्त आहे. शेखू आणि हिरणवार टोळीचेही राजकीय ‘कनेक्शन’ आहे. शेखूला हिरणवार टोळीतील एका सदस्याने पवन आणि बंटीची टिप दिली. त्यामुळेच सरोजच्या पाच साथिदारांसह हिरणवारच्या कारचा पाठलाग केला, अशी चर्चा आहे. दुसरीकडे हिरणवार टोळीची टिप देणारा तो कोण? अशी चर्चा रंगली आहे.