नागपूर, दि. 8 जानेवारी: – एप्रिल ते डिसेंबर 2024 या नऊ महिन्यांत महावितरणकडून नागपूर जिल्ह्यातील 2 हजार 797 ठिकाणी थेट वीजचोरी करणा-यावर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच प्रत्यक्ष कारणाव्यतिरिक्त इतर कारणासाठी अथवा अप्रत्यक्ष वीज वापर करणा-या 195 ग्राहकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
वीज चोरी विरोधात नऊ महिन्याच्या काळात महावितरणने केलेल्या या कारवाईत नागपूर जिल्ह्यातील वीजचोरी करणा-या 2 हजार 797 ग्राहकांनी तब्बल 4 कोटी 94 लाख रुपयांच्या 25 लाख 57 हजार 24 युनिटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. वीजचोरीपोटीच्या देयकांसह 2 हजार 690 ग्राहकांना तडजोडीपोटी 1 कोटी 11 लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून 29 ग्राहकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या 2 हजार 797 ग्राहकांमध्ये तारांवर आकडा टाकून वीजचोरी करणा-या 1 हजार 501 ग्राहकांचा तर 1 हजार 296 ग्राहकांनी प्रत्यक्ष मीटरमध्ये छेडछाड, मीटर बंद पाडणे, मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे, छिद्र करून मीटरमध्ये रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती संथ करणे या माध्यमातून थेट वीजचोरी केलेली आहे. याशिवाय प्रत्यक्ष कारणाव्यतिरिक्त इतर कारणासाठी अथवा अप्रत्यक्ष वीज वापर करणा-या 195 ग्राहकांना 2 लाख 33 हजार 356 युनिट वीजेचा अप्रत्यक्ष वापर केल्या प्रकरणी 54 लाखांचे देयक आकारण्यात आले आहे
वीजचोरी पकडण्यासाठी महावितरण सातत्याने वीजचोरी विरोधात मोहीम राबवते. महावितरणकडून नागपूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एप्रिल-2024 ते डिसेंबर-2024 या नऊ महिन्यांत उघडकीस आणलेल्या वीज चोरीच्या प्रकरणामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे, मीटरच्या मागच्या बाजूने छिद्र पाडत मीटरमध्ये रोध निर्माण करून मीटर बंद पाडणे किंवा मीटरची गती संथ करणे असे अफलातून प्रकार उघडकीस आले आहेत.
वीज चोरांविरोधातील मोहीम अधीक आक्रमक करण्याचा निर्णय महावितरणतर्फ़े घेण्यात आला असून या मोहिमेत सदोष मीटर, सरासरी वीज बिल असणाऱ्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरुवात देखील करण्यात आली आहे. तसेच थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेले सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी झाले नसलेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय देखिल महावितरणने घेतला असल्याने अशा सर्वच ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.
वीजचोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे विद्युत तारांवर, रोहित्रावर त्याच्या मयदिच्या पलीकडे भार पडतो, परिणामी रोहित्रात बिघाड होतो. शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्याचा नाहक त्रास नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना होतो व महावितरणला त्याचा मोठा आर्थिक फटका बसतो. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यावर महावितरणला ग्राहकाच्या रोषाला सामोरे जावे लागते, सबब सर्व ग्राहकांनी विजेचा रितसर मीटर घेऊनच वापर करावा आणि वापरलेल्या वीजेच्या देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.