बालाघाटवरुन येणारा सहा लाखांचा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त

0
518
सुंगधित तंबाखूची वाहतूक करतांना पोलिसांनी पकडलेले हेच ते वाहन रामनगर पोलीस ठाण्यात
अन्न औषध प्रशासन विभागाची भूमिका संशयास्पद
गोंदिया,दि.१६ ः बालाघाटकडून गोंदियाकडे चारचाकी वाहनातून आणला जात असलेला सव्वा सहा लाखांचा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामनगर पोलिसांच्या डी. बी. पथकाने बुधवारी (ता. १५) रात्री साडेआठच्या सुमारास येथील बालाघाट टी-पाइंटवर केली. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.गोंदिया शहरात सुंगधित तंबाखूचा मोठा व्यवसाय असून अन्न औषध विभागाचे अधिकारी मात्र आंधळ्याच्या भूमिकेत असल्याने पोलिसांना या कामात कारवाई करण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाच्यावतीने जोपर्यंत अधिकृत कारवाईची प्रकिया होत नाही,तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही.ही घटना बुधवारच्या रात्रीची असून गुरुवारच्या रात्री उशीरापर्यंत अन्न औषध प्रशासन विभागाने काय कारवाई केली हे कळू शकले नाही.यासंदर्भात या विभागाचे अधिकारी संजय शिंदे यांना विचारणा केली असता विभागाचे अधिकारी तपासाला गेल्याचे सांगण्यात आले.तर याच विभागाचे निरिक्षकांना भ्रमणध्वनी करुन सदर प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आले असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.यावरुन अन्न औषध प्रशासन विभाग सुंगधित तंबाखूची वाहतूक करणार्या व विक्री करणार्याच्या पाठिशी तर नाही ना अशा प्रश्न निर्माण झालेला आहे.
रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे हे बुधवारी रात्रीला पथकासह पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना सुगंधित तंबाखू घेऊन चारचाकी वाहन बालाघाटकडून गोंदियाकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिस पथकाने येथील बालाघाट टी-पाइंटवर पाळत ठेवली. बालाघाटकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. दरम्यान,
बालाघाटकडून आलेल्या एमएच ३५/ ए. जे. २६१३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, पथकाला या वाहनात सुगंधित तंबाखूच्या जवळपास दहा पिशव्या आढळून आल्या. वाहन चालक बालाजी लक्ष्मीरायण नायडू (रा. छोटा गोंदिया) याची अधिक चाैकशी केल्यावर त्यात सव्वा सहा लाखांचा हा तंबाखू गोंदियाला नेला जात असल्याचे समजले.
पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून, सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, अजय परसराम चांदवानी यांच्या मालकीचे हे वाहन आहे,त्यांचा स्वतःचा ट्रांसपोर्टचा व्यवसाय असून त्या माध्यमातून सुगंधित तंबाखू वाहतूकीचा व्यवसाय करीत असल्याचे बोलले जात आहे.यांचा एक सहकारी असून तो सहकारी आपण पोलीस व अन्न औषध विभागाच्या अधिकारीसह सर्वांना मासिक पगार देत असल्याने आपल्यावर कोण कारवाई करणार अशा बाता मारत असल्याची चर्चा गोंदियाच्या बाजारात आहे.
कारवाई करणारे पोलिस पथक
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, रामनगरचे पोलिस निरीक्षक बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे, सहायक फाैजदार भुरे, पोलिस हवालदार चव्हाण, पोलिस हवालदार भगत, पोलिस शिपाई नागपुरे, कांबळे, फेंडर यांनी केली.