५ लाखाची लाच स्विकारलेल्या त्या दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा नव्याने वाढ

0
173

सोलापुर;-मंगळवेढ्यात अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यामधून आरोपींची नावे कमी करण्यासाठी १० लाखाची मागणी करुन पहिला हप्ता ५ लाखाचा स्विकारताना लाचलुचपत सांगली विभागाने रंगेहाथ पकडलेल्या पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना मे.पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता पुन्हा दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची वाढ मे. न्यायालयाने केली आहे.

या घटनेची हकीकत अशी की,वरील दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून तक्रारी अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यातून आरोपीची नावे कमी करण्यासाठी १० लाख रूपयांची मागणी करुन पहिला हप्ता ५ लाख रुपयांचा माचणूर येथील श्री सिध्देश्वर माचणूर परिसरात लाचलुचपत विभाग सांगली यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.

याचा तपास सोलापूर लाचलुचपत विभागाचे डी.वाय.एस.पी.गणेश कुंभार हे करत असून पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्या दोघांना पुन्हा मे.जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी उभे केल्यावर दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान फिर्यादीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे नाव आल्याने तसेच समाजातील एका खालच्या स्तरातील व्यक्तीकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी केल्याने या प्रकरणाला मोठे गांभीर्य निर्माण झाले आहे.

मोठ्या माशावरती कारवाई होणार की त्यांना बगल मिळणार याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.त्या दिशेने तपास होणे त्या दृष्टीने महत्वाचे आहे.या लाच प्रकरणामुळे सोलापूर जिल्हयात मंगळवेढा पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी भविष्यात पोलीसांना सावधानतेने पावले टाकण्याची गरज सुजाण नागरिकामधून व्यक्त होत आहे.

लाच प्रकरणाची घटना घडल्यापासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात कमालीची शांतता पसरली आहे.अजून तीन कर्मचारी येथील टार्गेट असल्याची चर्चाही परिसरात ऐकावयास मिळत आहे.दोन वेळा बोराळे बीट मधील कर्मचारीच लाच प्रकरणात अडकल्याने बोराळे बीटकडे पाहण्याचा दृष्टीकोन नागरिकांचा बदलला आहे.दुपारी तपासाधिकारी मंगळवेढ्यात दाखल झाल्यानंतर दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.