गोरेगाव तालुक्यात बबई कालव्याजवळ आढळला महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह

0
6407
गोंदिया,दि.१०-गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ शेतशिवारात अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना आज सकाळी (दि.१०) सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी ६ वाजताच्या काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. यानंतर गावकऱ्यांनी याची माहीती लगेच गोरेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. सदर महिला ही ३० ते ३५ वर्ष वयोगटातील आहे. सदर घटना नेमकी कशी घडली. याविषयी माहिती मिळू शकली नाही. महिलेच्या शेजारी दुसऱ्या बांधीत तणसाचे ढीग जळालेले आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. महिलेला नेमके कोणी कसे आणि का जाळले हे तपासानंतरच पुढे येणार आहे. गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटेच्या सुमारास घटना घडल्याचा अंदाज
ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी आढळलेल्या स्थितीवरुन हा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान 
सदर महिलेचा चेहरा व वरील भाग पुर्णपणे जळालेला आहे. त्यामुळे या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.