हिंगोली:-हिंगोलीमध्ये पिकअप आणि कारच्या भीषण अपघातामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिंगोली औंढा राज्य महामार्गावर मध्यरात्री ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे (वय-२५) यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नऊ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ रोडवरील पिंपरी लिंबाळा मक्ता परिसरात अजिंक्य घुगे हे आपल्या कारमधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. दरम्यान गाडी अनियंत्रित झाल्याने त्यांची कार आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घुगे हे जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिवाय या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले असून कारचे इंजिन कारमधून बाहेर पडले असल्याचं दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनेश पोले आणि निखिल पराडकर अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कारचे इंजिन तुटून बाहेर पडले होते. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. या घटनेमुळे मनसेमध्ये शोककळा पसरली आहे.