गोंदिया- गोंदियातील एका मोठ्या व्यावसायिकाकडे असलेले 65 लाख रुपयांचे दागिने आणि इतर मुद्देमाल शिवनाथ एक्सप्रेसमधून महिनाभरापूर्वी चोरीला गेला होता. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी छडा लावत ओरिसा राज्यातून चोरट्यांना ताब्यात घेतले. संतोष साहू ऊर्फ आफ्रिदी (34, रा. राधिका गली राऊरकेला), अब्दुल मन्नान (55, रा. राऊरकेला) अशी चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिनेश पटेल यांच्या पत्नी हिना पटेल (54, रा. गोंदिया) या 4 एप्रिल 2025 रोजी पतीसोबत गोंदियाहून रायपूरला शिवनाथ एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. राजनांदगाव आणि दुर्ग रेल्वे स्थानका दरम्यानच्या प्रवासादरम्यान, महिलेचा पर्स चोरीला गेला होता. त्यात दोन हिऱ्यांचे हार, चार हिऱ्याच्या अंगठ्या, एक कानातले दागिने आणि 45 हजार रोख रक्कम होती. तसेच एक मोबाईल देखील चोरीला गेला होता. या प्रकरणाची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली होती. रेल्वेच्या पोलिस अधीक्षक श्वेता श्रीवास्तव सिन्हा यांनी रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक एस.एन. अख्तर आणि सायबर सेलचे प्रभारी, जीआरपी भिलाई पोलिस स्टेशनचे प्रभारी यांना आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या होत्या.