लैंगिक छळाच्या आरोपात अभिनेता विजय राज निर्दोष

0
85

गोंदिया: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विजय सुखविंदरसिंग राज (५१) हा एका चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता २०२० मध्ये आला होता. दरम्यान त्याच्यासोबत असलेल्या महिला को मेंबरने विजय राज याच्यावर लैंगिक छळाचा आरोप करीत रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी विजय राजला अटक करून सुटका केली. हे प्रकरण गोंदिया न्यायालयात सुरू होते. दरम्यान न्यायालयाने विजय राज यांची १४ मे रोजी निर्दोष सुटका केली.
विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटात अभिनेता विजय राज हे याने काम केले आहे. बालाघाट जिल्ह्यात २०२० मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. तेव्हा चित्रपटाच्या सेटवर एका सहकाऱ्याने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. विजय राजने महिलेच्या दिसण्याबद्दल टिप्पणी केली होती. यावरून हा वाद सुरू झाला होता. आता चार ते साडे चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे सुनावणीदरम्यान गोंदियाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महेंद्र सोते यांनी अभिनेत्याविरुद्ध पुरेशे पुरावे सादर करण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरला असल्याने न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ) आणि ३५४ (ड) अंतर्गत सर्व आरोप रद्द केले आहेत.
पिडीत ही शेरनी चित्रपटाच्या चमूतील सहाय्यक व्यवस्थापक व आरोपी हा पूरक अभिनेता म्हणून गेट वे हॉटेल, गोंदिया येथे आले होते. २५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास आरोपीचा खाजगी सहाय्यक राम हा पिडीतेला बोलाविण्यास सांगितले होते. परंतु पिडीतेने येण्यास नकार दिला होता. कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविले असता तिने येण्यास नकार दिला होता. २८ ऑक्टोबर रोजी आरोपीने तिला दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाबाबत विचारणा करण्याबाबत बोलविले. २७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी९ वाजताच्या दरम्यान आरोपीने हॉटेल गेट वे च्या लिफ्ट जवळ तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. २९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान जटाशंकर महाविद्यालय, बालाघाट येथे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी ती आरोपीला व्हॅनीटीचा रस्ता दाखवित होती. त्यावेळी आरोपीने तिच्या डाव्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर चित्रपटाचे शेवटचे चित्रीकरण्याच्या वेळी आरोपीचा मेकअप मॅन सतीश व खाजगी सहाय्यक राम हे त्याच्यासोबत असतांना तिच्या तोंडावरील मास्क दोन-तीन वेळा बाजूला केला. चित्रीकरण झाल्यानंतर आरोपीने तिला त्याच्या जवळ बोलविले. तिच्या केसांची प्रसंशा करीत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले होते. एकंदरीत या प्रकरणात कव्वा बिर्याणीचा फेम असलेल्या विजय राजला निर्दोष मुक्त करण्यात आले. विजय राज यांचा वकील म्हणून ॲड. व्ही.एन. बारापात्रे, व ॲड. सविना बेदी ह्या होत्या.
पाच साक्षदार तपासले
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पोपट दिवेकर यांनी केला होता. घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. पाच सा१दार न्यायालयात हजर करण्यात आले होते. अपराधाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुणीच नव्हते. पाच साक्षदारांची साक्ष ही ऐकीव स्वरुपाची आहे. त्यांच्या साक्षीला अभिलेखावर पिडीत किंवा इतर कोणत्याही साक्षीदाराची सुसंगत साक्ष उपलब्ध नाही. त्यामुळे साक्षीदाराची साक्ष आरोपीचे अपराधीत्व सिध्द करीत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.