
गोंदिया,दि.२४ः लग्नात मिळालेले आंदन आणत असलेला ट्रक्टर ट्रालीसह उलटल्याने यात एका युवकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची ही घटना २३ मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास जांभळी ते झुरकुटोला मार्गावर घडली.राहुल रामकिसन कोडापे(२७,रा.सलंगटोला,ता.सडक अर्जुनी)असे मृताचे नाव आहे.
एमएच ३५ एडयू ३७८४ क्रमांकाच्या ट्रक्टरने सालेकसा तालुक्यातील एका लग्नसोहळ्यातील आंदनात मिळालेले साहित्य सलंगटोला खाडीपार येथे आणले जात होते.ट्रॅक्टरवर योगेश पांडुरंग मरसकोल्हे(३८),दिलीप उर्फ गोलू मडकाम (१८),रुपेश सुरेश मसराम (२९), होमेश्वर सुखराम मसराम (३५),मनोज पतिराम मसराम (२९) व देंवेद्र प्रकाश मसराम (३४)सर्व रा.सलंगटोला खाडीपार हे होते.ते दरम्यान जांभळी ते झुरकुटोला मार्गावर ट्रॅक्टर चालक दीपक विजय मसराम (२३)रा.सलंगटोला खाडीपार याचे स्टिअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला खाली गेला.यात ट्राॅली उलटून राहुल कोडापे याचा मृत्यू झाला.उर्वरीत सहा जण जखमी झाले.या घटनेची नोंद डुगीपार पोलिसांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार इस्कापे करीत आहेत.