
इगतपुरी- सातबाऱ्यावर फेरफार नोंदणी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या आईवडिलांच्या नावे मोडाळे गावात मिळकत असून मिळकतीचा गाव नमुना, सातबारा अधिकार अभिलेखपत्रक यावर न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्रयस्थ संबंधास प्रतिबंध अशी फेरफार नोंद होती. या दाव्यात निकाल लागून आदेश झाले होते. त्यावरून तक्रारदाराच्या वडिलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आधीचा फेरफार नोंद रद्द होण्यासाठी तहसीलदार आणि संशयित तलाठी योगिता कचकुरे, ४२,सोमेश्वर काॅलनी, एबीबी कंपनीजवळ, सातपूर यांच्याकडे अर्ज केला होता.
अर्जावर कार्यवाही करुन नोंद घेण्याच्या मोबदल्यात योगिता कचकुरे यांनी १० हजार रुपयांची मागणी करुन रक्कम स्वीकारली. तर वाडीवऱ्हेचा मंडळ अधिकारी दत्तात्रय टिळे ( ३५, रा. भगूर, नाशिक) याने नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी स्वतः साठी केली. तलाठी योगिताला रंगेहात पकडण्यात आले असून फरार मंडळ अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे.दोघांच्याही विरुद्ध भगूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.