महसूल मंडळ अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेतांना रंगेहाथ अटक

0
50
सातारा,दि.०७ःजिल्ह्यातील कोडोली येथील महसूल मंडळ अधिकाऱ्याने सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.त्या रक्कमेपाकी ७५ हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.त्या महसूल मंडळ अधिकारीचे नाव अजित दादासाहेब घाडगे (वय ४८), असे आहे. यामुळे महसूल खात्यातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. वास्तविक पाहता ( ७/१२ )  सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी एक रुपया सुद्धा लागत नाही.मात्र ह्या  मंडळ अधिकाऱ्याने चक्क एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
अजित दादासाहेब घाटगे याच्याकडे कोडोली (सातारा) मंडळाचा तात्पुरता प्रभार होता. यावेळी सातबारावर उताऱ्यावरील नोंदीच्या आक्षेपाचे प्रकरण त्याच्या कडे आले होते. तक्रारदार हे खिंडवाडी (ता.सातारा) येथील गट क्र. १७/१/१ या शेतजमिनीच्या खरेदी दस्ताऐवजावरील व्यक्तीचे कुलमुखत्यार आहेत. यातील ६० गुंठे जमिनीपैकी १३ गुंठे जमीन विक्री झाली नव्हती. याचा गैरफायदा घेत मूळ मालकाने २०२४ मध्ये उर्वरित ४७ गुंठ्यांपैकी १० गुंठे जमीन पुन्हा विकली. यानंतर याची नोंद खिंडवाडीच्या तलाठ्याने ७/१२ उताऱ्यावर केली.
     तक्रारदाराने मंडळ अधिकारी याच्याकडे या नोंदीवर आक्षेप नोंदवला होता. सुनावणीअंती मंडलाधिकारी अजित घाडगे याने तक्रारदाराचा आक्षेप मान्य करत १० गुंठे जमिनीच्या नोंदीला स्थगिती दिली. आक्षेपावरून फेरफार रद्द करण्यात आला असल्याचे सांगून उताऱ्यावर उर्वरित ४७ गुंठे जमीन त्यांच्या बाजूने नोंदवण्यासाठी १ लाख रुपये लाचेची मागणी केली.
    मात्र तडजोडी नंतर ७५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सातबारावर नाव नोंद करण्यासाठी १ लाख रुपये लागतील, असे अजित घाडगे याने तक्रारदाराला सांगितले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची गंभीर दखल घेत सापळा रचला आणि ७५ हजार रुपये स्विकारताना मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, नीलेश राजपूरे यांनी ही कारवाई केली.