
मूल : पैशाच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कोंबडी कापण्याच्या सत्तूरने सपासप वार करून एका युवकाची भर चौकात हत्या करण्यात आली. घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ही घटना मूल तालुक्यातील मारोडा येथे बुधवारी दुपारी १२ वाजता घडली.
शंतनू मुरलीधर येरणे (२२, रा. मारोडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अमित अनिल निकेसर (३२, रा. मारोडा) असे आरोपीचे नाव आहे. अमित निकेसर यांचे मारोडा येथे अमित चिकन सेंटर नावाने चिकन विक्रीचे दुकान असून, रेतीचा व्यवसाय आहे. शंतनू येरणे हा अमितकडे दिवानजीचे काम करीत होता. महसूल विभागाकडून घरकुल लाभार्थीना रेती वाटप सुरू असल्याने अमितने घरकुल लाभार्थीना रेतीचा पुरवठा केला होता. शंतनू सकाळी रेतीची वसुली करून अमितकडे हिशोब देत असताना दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अमितने चिकन सेंटरमधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने शंतनूच्या पोटावर, छातीवर सपासप वार करून जागीच ठार केले. वाद सोडविण्यासाठी आलेल्या शंतनूचे वडील सुद्धा जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने मूल पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना घटनेची आपबीती सांगितली. पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.