अकोला जि.प.कर्मचारी संघटना प्रमुखाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल…

0
34
अकोला,दि.१८ःयेथील जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी युनियनचे तथा मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सुनील जानोरकर यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.जिल्हा परिषदेतीलच एका महिला कर्मचार्यांने ही तक्रार नोंदवली आहे.
सुनिल जानोरकर हे राज्य सहसरचिटणीस,जि.प.कर्मचारी युनियन तथा जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ या पदावर कार्यरत आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असताना एका महिलेने त्यावेळी पोलिस स्टेशन व जिल्हा परिषदेच्या वरिष्ट अधिकाऱ्यांकडे जानोरकर विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती.परंतु पोलिसांनी त्यावर दखल न घेतल्याने सदर महिलेने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.तर जिल्हा परिषदेतील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दखल घेण्याची जबाबदारी असलेल्या विशाखा समितीने त्या तक्रारीची वेळीच योग्य ती दखल न घेता चालढकल केल्याने गुन्हा दाखल होण्यास बराच उशीर झाला आहे.
यातील फिर्यादी व आरोपी जिल्हा परिषद अकोला येथे एकाच विभागात काम करत असल्याने आरोपीने फिर्यादी सोबत सलगी साधण्याचा प्रयत्न केल्याने व त्यावर विशाखा समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्याने व फिर्यादी पीडितेचे बयान घेऊन  सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.२७/४/२०१२ ते दि.८/३/२०१९ या दरम्यानच्या काळात घडलेल्या घटनेबाबत काल दि.१७/६/२०२५ च्या रात्री ८:४३ या दरम्यान पोलीस स्टेशन,सिटी कोतवाली,अकोला येथे अप.क्रमांक १८३/२०२५ नुसार ३५४(अ) ३५४(ड) भा.द.वि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संतोष धारपवार, पोस्टे सिटी कोतवाली हे करीत आहेत.