23.9 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home गुन्हेवार्ता तांदळाने भरलेला ट्रक लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ जण अटक, इतर फरार आरोपींचा...

तांदळाने भरलेला ट्रक लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ जण अटक, इतर फरार आरोपींचा शोध सुरू

0
9

गोंदिया,:रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकाला ओलीस ठेवून ३० टनांपेक्षा जास्त तांदळाने भरलेला ट्रक लुटण्याच्या खळबळजनक घटनेचा गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून लुटलेला ट्रक आणि सुमारे ३० टन १०७ किलो तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १८ लाख रुपये सांगण्यात आली असून, फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असलेले ट्रक चालक नवीन श्रीरामचन्द्र मौर्या (वय ३५) हे १५ जुलै २०२६ रोजी मध्य प्रदेशातील चाकघाट भागातून सुमारे ३० टन ७६५ किलो तांदूळ घेऊन दिल्लीसाठी निघाले होते. १६ जुलैच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रक रावणवाडी परिसरात पोहोचला. त्याच वेळी चार अनोळखी बदमाशांनी रस्ता अडवून चालकाकडे आधी पाणी मागितले आणि नंतर त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी चालकाचे हात-पाय बांधून त्याला ओलीस ठेवले आणि तांदळासह ट्रक लुटून पसार झाले.

या घटनेनंतर चालकाच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, लुटलेला ट्रक आणि तांदूळ गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोहका गावात लपवून ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने जाळे रचून संजय राजकुमार दमाहे (वय २०, रा. कोहका, जि. गोंदिया) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने ट्रक लुटल्याची आणि तांदूळ वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याची कबुली दिली. आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी विविध ठिकाणांवरून एकूण ३० टन १०७ किलो तांदूळ जप्त केला, तसेच लुटलेला ट्रकही ताब्यात घेतला. जप्त केलेल्या तांदळाची किंमत सुमारे ८ लाख १३ हजार ६९९ रुपये आणि ट्रकची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रावणवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. तर या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके सतत छापे टाकत आहेत.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

blank