महिला सरपंचाला शिवीगाळ, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्राॅसिटी

0
121

अकोला : उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यान्वये (ॲट्राॅसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला सरपंचाला जातिवाचक शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या दबावात येऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप गोपाल दातकर यांनी केला आहे. या प्रकरणावरून भाजप व उबाठा सेनेत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

हिंगणी बु. ग्रामपंचायतच्या सरपंच महिलेला गोपाल दातकर यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार शहर कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांसमोर ही शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर गोपाल दातकर यांनी स्पष्टीकरण दिले. हिंगणी बु. ग्रा.प.अंतर्गत ओबीसींचे घरकुल मंजुरीसाठीच्या लाभार्थ्यांनी नमुना आठ ‘अ’ची ग्रामसभेत मागणी केली होती. मात्र, नमुना ८ न मिळाल्याने ही बाब गट विकास अधिकाऱ्यांना सांगितली. दोन वेळा पत्रही दिले. तरीही नमुना ८ न मिळाल्याने सीईओंकडे धाव घेतली. सीईओ उपस्थित नव्हत्या. याठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांगर, गटविकास अधिकारी रुद्रकार, सह. गटविकास अधिकारी परिहार हेही होते. हिंगणी बु.च्या सरपंचही त्याठिकाणी आल्या. त्यांनी नमुना ८ देण्यास नकार दिला. सरपंच यांना भाजपचे सहकार्य असून, दबावात येऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मी जातिवाचक शिवीगाळ केली नसून, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाजू गोपाल दातकर यांनी मांडली आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले असून उबाठा सेना व भाजपमध्ये वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.