केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

खासदार नाना यांचे निर्देश

गोंदियाः जिल्ह्यातील नागरिकांना विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासह वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा.नाना पटोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारला जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डी डी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा.पटोले म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालय येथे आयोजित लोकशाही दिनाला तालुका पातळीवरील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी योग्य समन्वयातून पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामे करताना उत्कृष्ट दर्जाची कामे होतील याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी ग्राहकांसाठी बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही खा.पटोले यांनी सांगितले. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवेसाठी चांगले कव्हरेज मिळाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे, असेही खा.पटोले म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, जिल्ह्यात १७ मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला वन विभागाकडून जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल. मोबाईल टॉवर उभारणीमुळे बीएसएनएलच्या इंटरनेट व मोबाईल सेवेचे कव्हरेज चांगले मिळण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यात १ ते ९ टप्प्यात २४१ रस्त्यांचे ८२७ कि.मी.ची कामे झाली आहेत. सन २०१३-१४ मध्ये १३ पुलांचे कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६१३ कामे सुरू आहे. या कामांवर ४६२३ मजूर काम करीत आहे. जिल्ह्यात स्वतंत्र ३८८ ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यरत असून त्यापैकी केवळ ६ योजना नादुरुस्त आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ५५६ ग्रामपंचायतीपैकी ३२७ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील ७४ हजार ७८९ घरगुती लाभार्थ्यांना विद्युतीकरण योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.