एमकॉम सत्र ४ व आयडॉलच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीए परीक्षेचा निकाल जाहीर

0
95

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील पदव्युत्तर एमकॉम सत्र ४ चा निकाल काल रात्री जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के  लागला आहे. या परीक्षेत  एकूण ६ हजार ९४५  विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला ९ हजार ७४  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  त्यापैकी ८ हजार ९६७ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर १०७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३८९ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.  या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आजपर्यंत विद्यापीठाने २०६  निकाल जाहीर केले आहेत.

आयडॉलच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीए परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या  शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या तृतीय वर्ष बीकॉम व बीए  परीक्षेचा निकाल जाहीर  करण्यात आला असून यातील  तृतीय वर्ष बीकॉम  परीक्षेचा निकाल ८७.०३ टक्के  लागला आहे. बीकॉम परीक्षेत  २०८९  विद्यार्थ्यांनी  प्रथम वर्ग प्राप्त केला असून ६६४ विद्यार्थ्यांनी  व्दितीय  वर्ग प्राप्त केला आहे तर ६५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६ हजार २३१  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  त्यापैकी ५ हजार ८९३ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ३३८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५०८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

आयडॉलच्या तृतीय वर्ष बीए  परीक्षेचा निकाल ९१.४७ टक्के  लागला आहे. बीए  परीक्षेत  २०४६  विद्यार्थ्यांनी  प्रथम वर्ग प्राप्त केला असून ४३१ विद्यार्थ्यांनी  व्दितीय  वर्ग प्राप्त केला आहे तर २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३ हजार २७  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  त्यापैकी ३ हजार ५८९ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर २०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच २५१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

 

व्दितीय सत्राचे (हिवाळी ) परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे अनेक महत्वाचे निकाल जाहीर झाले आहेत. यानुसार मुंबई विद्यापीठाने २०२० मध्ये  व्दितीय ( हिवाळी ) सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज  भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयाने परीक्षा अर्ज ऑनलाईन भरण्याची व ते फॉर्म विद्यापीठात दाखल  करण्याची तारीख ११ ते २८ नोव्हेंबर २०२० हि असून विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर २०२० हि आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयांनी संबधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, नाव ( मराठी व इंग्रजी या दोन्ही लिपीत ), माध्यम, परीक्षा केंद्र, विषय व दिव्यांग इ. बाबी बरोबर आहेत, याची खात्री करून घ्यावी. हि माहिती गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र यासाठी वापरण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज विद्यापीठात दाखल झाल्यावर वरील कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.

ऑनलाईन परीक्षा अर्ज विद्यापीठात दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयाच्या लॉगिनमधून परीक्षेचे विषय बदल करता येतील. परीक्षा अर्ज विद्यापीठात ऑनलाईन दाखल झाल्यानंतर परीक्षेच्या विषयामध्ये बदल करायचा असल्यास प्रति विषय रुपये ५०/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल.

महाविद्यालयांनी हिवाळी सत्रासाठी परीक्षा अर्ज विहित तारखेत भरून देणे आवश्यक आहे. यानुसार लवकरच हिवाळी परीक्षेचे परिपत्रक जाहीर करण्यात येईल.