
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
भंडारा : दि. ६ भंडारा जिल्ह्याच्या विक्रमवीर बाल वैज्ञानिकांनी आश्चर्यकारक गगनभरारी घेतल्याचे जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी गौरोद्गाराद्वारे विद्यार्थ्यांना सन्मानित केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज २०२१ प्रकल्पाद्वारे देशात पहिल्यांदाच मार्टिन ग्रुप तर्फे जागतिक, आशियाई आणि भारतीय विक्रम साधण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेल्या भंडारा जिल्ह्यातील विक्रमवीर बाल वैज्ञानिकांच्या दि. ६ जुलै रोजी स्थानिक जेसिस कॉन्व्हेन्टच्या सभागृहात जिल्हाधिकारी संदिप कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांच्या हस्ते तसेच फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य डॉ. विशाल लिचडे, दामोधर डहाळे, जेसिस कान्व्हेन्टचे विश्वस्त मोहन निर्वाण, मुकेश पटेल, भंडारा तालुका समन्वयक पांडुरंग कोळवते, मांडवी शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद राऊत तसेच पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक विक्रमांचे प्रत्येकी पाच प्रशस्तीपत्रके देवून अभूतपूर्व असा ऐतिहासिक सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वतःस प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे असेही या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. या प्रकल्पात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सक्रिय सहभागाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य डॉ. विशाल लिचडे यांनी सदर प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगून डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना, कार्ये व भविष्यातील प्रकल्प यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून भारतातील तब्बल १००० बाल वैज्ञानिकांद्वारे एकाच वेळी पूर्णपणे भारतीय बनावटीचे १०० लघु उपग्रह (पेलोड क्युब) बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात सोडून एकाच वेळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड या पाच विक्रमांवर भंडारा जिल्ह्याच्या बाल वैज्ञानिकांनी नाव कोरले. यात गुंजन सहसराम बन्सोड, रजत सुदाम हटवार, सोहम नानेश्वर मांढरे, आर्या देवानंद मेश्राम, अंतरा देवानंद मेश्राम, नंदिनी जयेश भवसार, पूर्वा भाष्कर गिरेपुंजे, पियुष किशोरकुमार हुकरे, सुमित गोविंद कापगते, इंद्रनील ईंद्रजीत बिश्वास, यश गोपाल सेलोकर, अर्णव अशोक गायधने, अथर्व अशोक गायधने, वैभव सुखदेव मस्के, प्रिन्स फालचंद कोरे, यशस्वी जिवनदास सार्वे, छबील विनोदकुमार रामटेके, प्रज्वल सिद्धार्थ चौधरी व दामिनी सहसराम बन्सोड तसेच तुमसर तालुक्यातील जिल्हा परीषद पूर्व माध्यमिक शाळा मांडवीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ‘राईस सिटी तुमसर’ या गटांतर्गत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यात आचल रामक्रिष्ण बुराडे, योगेश्वरी अरुण ढबाले, खुशबु शिवशंकर ढबाले, राणु कैलास मते, वेदिका भारत ढबाले, साक्षी रवी ढबाले, अंशुल दुर्वास टांगले, समिक्षा अरुण ढबाले, प्रज्वल रामकिसन बुराडे तसेच तुमसरच्या जनता विद्यालयाची जान्हवी अरविंद तुमसरे आदी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या प्रकल्पाकाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने शालेय जीवनापासूनच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण करून भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत या विद्यार्थ्यांनी देश सेवेत सक्रिय योगदान देणे हा होता. सदर विक्रमांवर नाव कोरण्यासाठी देशातील १००० बाल वैज्ञानिकांमध्ये एकट्या महाराष्ट्रातून ३६० बाल वैज्ञानिकांनी सहभाग नोंदवला होता हे विशेष.
पेलोड क्युब्ज चॅलेंज २०२१ प्रकल्पाची विशेषता
स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज,त्याचे विविध भाग व त्यांचे कार्य, बाहेरील कवच, हेलियम बलून, सेंसर, सॉफ्टवेअर अशी सर्व तांत्रिक माहिती व वापरण्याचे प्रशिक्षण खास महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषेतूनच देण्यात आले. हे लघु उपग्रह संपूर्ण भारतीय बनावटीचे आहेत. हे जगातील सर्वात कमी २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह बनवून ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे अवकाशात सोडून प्रस्थापित करण्यात आले.
पेलोड क्युब हे लघु उपग्रह एका केस मध्ये फिट करून या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडला होता. अवकाशातून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर वैज्ञानिक माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवत राहील. या पेलोड क्युब सोबत काही वनस्पतींच्या बीया सुद्धा पाठवण्यात आल्या. याद्वारे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास चालना मिळेल.
विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण करणारा तसेच त्यांना भविष्यात करियर बनविताना नक्कीच उपयुक्त ठरणारा हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् येथून संपूर्ण भारतभर डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया यांच्या मार्गदर्शनात, मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य समन्वयक मनिषा ताई चौधरी यांचे नेतृत्वात यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून गुंजन बन्सोड, आर्या मेश्राम व आचल बुराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर सत्कार सोहळ्याचे संपूर्ण नियोजन फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रा. सहसराम बन्सोड, जिल्हा समन्वयक प्राचार्या रंजना दारवाटकर व देवानंद मेश्राम यांनी करून अथक परीश्रम घेवून भंडारा चमूतील सर्व पालकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या दारवाटकर यांनी, सुत्र संचालन योजना महाजन यांनी केले तर प्रा. बन्सोड यांनी सर्वांचे आभार मानले.