शिक्षक संघाचे आंदोलन मागे;मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा

0
75

गोंदिया- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदियाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सोमवार 13 सप्टेंबर रोजी आंदोलन पुकारण्यात आले होते. तत्पुर्वी 9 सप्टेंबर रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांशी मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. चर्चेत पदाधिकार्‍यांचे समाधान झाल्याने सोमवारी होणारे आंदोलन मागे घेतले.
शिक्षकाच्या प्रलंबित मगण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यात मागण्या सोडविण्यासाठी आश्वासित करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र मागण्या निकाली काढण्यात आल्या नाही. गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारताच अनिल पाटील यांनी शिक्षक संघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. यात मागण्या पुर्ण न झाल्यास 13 सप्टेंबरपासून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान गुरूवार 9 सप्टेंबर रोजी सीईओ पाटील यांनी चर्चेसाठी शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांची सभा बोलावली. सभेत सामान्य प्रशसन विभागाचे उपमु‘य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, मुख्य वित्तलेखाधिकारी अश्विन वाहणे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी के. वाय. सरयाम यांना बोलावून चर्चा केली. चर्चेत सर्व प्रलंबित मागण्या, प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी उपाय योजना करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने 13 रोजी होणारे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी जाहीर केले. सभेचे संचालन जिल्हा सरचिटणीस एस. यू. वंजारी यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष डी. टी. कावळे यांनी मानले. सभेला शिक्षक संघाचे नेते आनंद पुंजे, अजय चौरे, कृष्णा कापसे, विरेंद्र भिवगडे, राजू रहांगडाले, के. एस. रहांगडाले, आर. एम ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.