- तंत्रनिकेतन प्रवेशाची संधी
- प्लेसमेंटची दिली माहिती
गोंदिया : शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी व या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घ्यावा यासाठी स्कुल कनेक्ट कार्यक्रमाविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी.डी.गोळघाटे यांनी केले. गोंदिया, तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील शिक्षकांची दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्कुल कनेक्ट उपक्रमात जिल्ह्यातील 177 शासकीय, निमशासकीय तसेच खासगी शाळांना सहभागी करून घेण्यात आले होते. दहावी झाल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. मात्र तंत्रनिकेतन हा उत्तम पर्याय असून या क्षेत्रात करिअर करतांना नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रशिक्षण यामधील फरक यावेळी त्यांनी समजावून सांगितला.
शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथे सहा विद्याशाखा असून येथे शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. याठिकाणी लागणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबतही प्राचार्यांनी माहिती दिली. अभियांत्रिकी डिप्लोमा केल्यानंतर भविष्यात कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया व स्किल इंडिया योजनेतही संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
स्कुल कनेक्ट हा उपक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा असून त्यांच्यामध्ये तंत्रनिकेतन विषयी जागृकता निर्माण करावी. शाळेत प्रकल्प प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, कोडिंग, ड्रोन, रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात यावेत असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाचे इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख तसेच स्कुल कनेक्ट उपक्रमाचे समन्वयक प्रशांत शर्मा यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल शासकीय तंत्रनिकेतन येथे घेऊन यावी ज्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयातील रुची वाढेल असेही ते म्हणाले.
मुख्याध्यापक एन.एस.कुंभारे, यू.एस. चिंधालोरे, व्ही.एस. फुलबांधे, व्ही.एस. माने, ए.बी. हरडे, आर.वाय. कटरे, एम.एल. पटले, के.एस. वैद्य, आर.डी. गेडाम व ए.जी. टेंभरे प्रत्यक्ष उपस्थित होते. शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची विविध कंपनीत झालेल्या प्लेसमेंटची माहिती अनुविद्युत व दूरसंचार विभागाचे अधिव्याख्याता भुपेंद्र देशमुख यांनी दिली. या बैठकीत उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.