मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे ई – कन्टेन्ट विकास केंद्र सर्वांना पथदर्शी ठरेल- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील 

0
13

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे  ई – कन्टेन्ट विकास केंद्र हे  शिक्षकांना  ई – कन्टेन्टचे प्रशिक्षण देईल तसेच ऑनलाईन अभ्यासक्रमासाठीही उपयुक्त ठरेल, हे केंद्र सर्वांना पथदर्शी ठरेल असे उदगार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे सेंटर फॉर एक्सलन्स इन ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंटच्या उद्घाटन प्रसंगी काढले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर व  आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील बोलताना पुढे म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून जे अनेक टप्पे ठरविले आहेत,त्यात विद्यार्थ्यांची नोंदणी वाढविणे हे एक आहे. तसेच आजच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करणेही आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाच्या या  ई – कन्टेन्ट विकास केंद्राला माझ्या शुभेच्छा. या प्रसंगी आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी आयडॉलच्या पाच दशकाच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच सेंटर फॉर एक्सलन्स इन ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंटचे समन्वयक प्रा. मंदार भानुशे यांनी या  ई – कन्टेन्ट विकास केंद्राची संकल्पना विशद केली.

 ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट सेंटर

या केंद्राच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील ३५०० प्राध्यापकांना ई-कन्टेन्ट निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रस्तावित ऑनलाईन अभ्यासक्रमासाठीही ई-कन्टेन्ट निर्मितीचे कार्य या केंद्रामार्फत होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित डिजिटल व ऑनलाईन शिक्षणासाठी या अद्ययावत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी आयडॉलने एका अद्ययावत स्टुडिओची उभारणी केली आहे.