विधिसभेतील पदवीधर मतदारसंघासाठी ५९ उमेदवार रिंगणात; विद्यापीठाकडून अंतिम यादी जाहीर

0
22

नागपूर -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत सर्व प्रवर्गांतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून ५९ उमेदवार रिंगणात राहणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी केवळ दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम यादी विद्यापीठाने जाहीर केली.

या यादीनुसार आता खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी ३० उमेदवार आहेत. या गटात हर्षवर्धन कापसे, ललित खंडेलवाल, अभिजीत मेश्राम, माधुरी पालीवाल आणि वीणा सरदार यांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आला आहे. अनुसूचित जाती गटात एका जागेसाठी ६ उमेदवार, अनुसूचित जमाती गटात एका जागेसाठी पाच उमेदवार, विमुक्त जाती गटात एका जागेसाठी सात उमेदवार, इतर मागासवर्गीय गटात एका जागेसाठी ७ उमेदवार आणि महिला गटात सहा उमेदवार आहेत.

या निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची छाननीनंतरची तात्पुरती यादी १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यावर, कुलगुरूंकडे अपील करण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानंतर बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. २ डिसेंबर रोजी निवडणुकीची मतमोजणी होईल.