आश्रमशाळा व वस्तीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांची होणार सिकलसेल तपासणी

0
22

24 नोव्हेबंर ते 30 डिसेंबर कालावधीत राबविले जाणार तपासणी शिबिर
तब्बल 10 हजार 500 विद्यार्थ्यांची होणार सिकलसेल तपासणी– डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
गोंदिया,दि.24ः-  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत जिल्ह्यात एकूण 11 शासकीय आश्रमशाळा, 23 अनुदानित आश्रमशाळा व 19 शासकीय आदिवासी वस्तीगृहातील प्रवेशित मुले/मुलांची सिकलसेल तपासणी करण्याचे पत्र जिल्हा आरोग्य प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने सिकलसेल तपासणी शिबिरांचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे. 24 नोव्हेबंर ते 30 डिसेंबर कालावधीत तपासणी शिबिर राबविले जाणार असुन संबधित विभागाला त्याची माहिती देण्यात आली आहे. आठ हि तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वस्तीगृह असलेल्या उपकेंद्र अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे मार्फत सिकलसेल संबधाने सोल्युबिलिटी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सिकलसेल समन्वयक सपना खंडाईत यांनी दिली आहे. तब्बल 10 हजार 500 प्रवेशित विद्यार्थांची सिकलतसेल तपासणी करण्याचे निरोजन करण्यात आले आहे.तपासणी शिबीरा दरम्यान शंभर टक्के मुला/ मुलांची उपस्थिती मुख्याध्यापक / शिक्षक/वार्डन यांनी ठेवून जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी डॉ. वानखेडे यांनी केले आहे.
सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणीनंतर पॉझिटिव रुग्णांचे रक्त नमुने इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी किंवा एच.पी.एल.सी. चाचणीच्या माध्यमातून योग्य निदान करण्यात येऊन लक्षणानुसार औषधोपचार सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सपना खंडाईत यांनी ह्यावेळी दिली आहे.
हा आजार जनुकीय दोषामुळे होत असल्याने तो आनुवंशिक आहे. आई- वडिलांकडून हा आजार अपत्यांमध्ये येतो. आनुवंशिक शास्त्राच्या नियमांनुसार हा दोष दोन प्रकारांत आढळतो. यातला एक प्रकार म्हणजे ‘सिकल सेल वाहक’ (कॅरिअर) आणि दुसरा म्हणजे ‘सिकल सेल पीडित’ (सफरर). वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र सिकलसेल ग्रस्त व्यक्तीस खुपच वेदना व त्रास होत असल्याने वांरोवार दवाखान्यात जावे लागते तसेच वेळ प्रसंगी रक्ताची गरज भासते.
‘सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. या दोषाला ‘सिकलिंग गुणधर्म’ असे म्हणतात. निरोगी माणसाच्या आणि सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव देण्यात आले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्त कमी होते. याच अवस्थेला आपण ‘अ‍ॅनिमिया’ म्हणतो. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ असे नाव पडले. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे.
या आजाराचे संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण मात्र शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित समतोल आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी. तरी जिल्ह्यातील नवयुवकांनी आवर्जून पुढे येऊन सिकलसेल बाबत सोल्युबिलिटी तपासणी करावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी केले आहे.
सिकलसेल आजार अनुवांशिक आहे पण संसर्गजन्य नसल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी केले आहे तसेच सिकलसेल रुग़्णांकरीता उपचारासाठी डे- केयर निर्माण केले आहे त्याचा लाभ सर्वांनी घेण्याचे ह्या प्रसंगी सांगितले.
सिकलसेल रुग्णांकरिता शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात –
1) इयत्ता दहावी व बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला वीस मिनिटे
अधिक कालावधी दिला जातो.
2) सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला एक हजार रुपये दिले जातात.
3) सिकलसेल ग्रस्त रुग्ण यांना अपंगत्वाचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे विविध योजनांचा
लाभ देण्यात घेण्यास पात्र आहे.
4) सिकलसेल ग्रस्त रुग्णांना पुढील उपचाराकरिता बस प्रवासात सवलत दिली जाते येण्या जाण्या करिता
प्रवास सवलत घेण्यास पात्र आहे
5) सिकलसेल ग्रस्त रुग्णांकरिता मोफत रक्त संक्रमणाची सुविधा आहे.
6) सिकलसेल ग्रस्त रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्राची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय
महाविद्यालय येथे उपलब्ध आहे.
जाणून घ्या –
सामान्य लाल रक्त पेशी या गोलाकार व लवचिक असतात तर सिकल सेल लाल रक्त पेशी विळाच्या आकाराच्या असतात तसेच कडक असतात.
लक्षणे 
अशक्तपणा ,सांधेदुखी, सांधे सुजणे, डोळे पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे.
तपासणी

  • बोटातून एक थेंब रक्त घेऊन सोल्युबिलिटी चाचणी केली जाते.
  •  ही चाचणी पॉझिटिव्ह असल्यास हिमोग्लोबिन एलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली जाते.
  •  सर्व आरोग्य संस्थेमध्ये सिकलसेल सोलबीलिटी चाचणी मोफत केली जाते

लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घ्या.
 असे विवाह टाळा-
1) दोघेही वाहक असतील तर
2) एक वाहक व एक ग्रस्त असेल तर
3) दोघेही ग्रस्त असतील तर
कारण त्यांच्या होणाऱ्या अपत्याला हा आजार होऊ शकतो
आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध सेवा –
1) सर्व सिकलसेल आजारी रुग्णांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या मोफत पुरविण्यात येतात.
2) रुग्णांना वेदना नाशक औषधे देण्यात येतात.
3) जंतुसंसर्ग झाल्यास अँटिबायोटिक देऊन उपचार करता येते.
4) गुंतागुंतीच्या रूग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात हलविणे.
5) रक्तसंक्रमण ची गरज असणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील डे-केअर केंद्रातुन रक्त संक्रमणाची सोय
उपलब्ध करणे.