जिल्हयातील सर्व शाळांतून होणार संविधानाचा गजर

0
20

जिल्हा परिषद उपाध्यक्ष  इंजि. यशवंत गणवीर यांचा निर्णय : शिक्षण समितीच्या सभेत ठराव पारित

गोंदिया, ता. 18 : विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेची माहिती व्हावी, तथा भविष्यातील एक सक्षम नागरीक तयार व्हावा, यासाठी जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये संविधानाच्या अभ्यासावर भर देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  इंजि.यशवंत गणवीर यांनी आज (ता. 18) पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेत दिले. त्याला शिक्षण समितीने एकमताने मंजूरी दिली असून जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह सर्व शासकीय, निमशासकीय तथा खासगी शाळांमध्ये आता संविधानाचा गजर होणार आहे.
भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानातून मुलभूत अधिकारासह मुलभूत कर्तव्य देखील सांगितले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास, त्याचे स्वांतत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण भारतीय राज्यघटना देते. त्यामुळे शालेय जीवनापासून संविधानाच्या अभ्यासावर शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा भर असायला हवा, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी शिक्षण समितीच्या सभेत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, शिक्षकांनी दररोज संविधानाच्या तीन कलमांचे फळयावर लेखन करून विद्यार्थ्यांकडून ते पाठांतर करून घ्यावे. विद्यार्थ्यांकडून त्यासाठी एक स्वतंत्र वही करावी. संविधानातील कलमांची त्यात नोंद करावी. इयत्ता पाचवी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात यावा. मात्र, इयत्ता 8 ते 12 च्या विद्यार्थ्यांकडून प्राथमिकतेने शिक्षकांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेसह 3 कलमांचे प्रतिदिन लेखन करून घ्यावे. त्या कलमा मुखोद्गत होतील याकडे लक्ष द्यावे. दरम्यान संविधानाच्या संबधाने विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्याला परिक्षा घ्यावी. या परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तथा प्रोत्साहनपर परितोषिक सुध्दा द्यावे. संविधान प्रत्येक शाळांमध्ये असायला हावा. तथा त्याची व्यापकता व सर्वसमावेशकता लक्षात घेता तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्याचे कार्य शिक्षकांनी करावे. असे आवाहनही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. इंजि. यशवंत गणवीर यांनी केले. दरम्यान विविध क्षेत्रातील शालेय समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याचे देखील निर्देश या बैठकीत देण्यात आले. बैठकीत शिक्षण समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य नेहा केतन तुरकर,अंजली गुलशन अटरे,लक्ष्मी रविशंकर तरोणेे,विमल बबलू कटरे,शैलेश तुळशीराम नंदेश्वर,सशेंद्र खेमचंद भगत,तुमेश्वरी लिलाधर बघेले,निशा शुभम जनबंधू, प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटधरे, सालेकसा गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, आमगाव गटशिक्षणाधिकारी कुसुम पुसाम, गोरेगाव गटशिक्षणाधिकारी एन.जे. सिरसाटे, सडक अर्जुनी गटशिक्षणाधिकारी एस. आर. बागडे, गोंदियाचे शिक्षण विस्तार अधिकारी  पी.पी. समरीत, तिरोडा शिक्षण विस्तार अधिकारी ये.एस. बरईकर, अर्जुनी मोरगाव शिक्षण विस्तार अधिकारी बी. डब्ल्यू भानारकर उपस्थित होते.