मुंबई विद्यापीठातर्फे पेट आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

0
68

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर: मुंबई विद्यापीठातर्फे पी.एच.डी. प्रवेश पूर्व परिक्षा ( पेट ) आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार आज (२६ ऑक्टोबर २०२४) पासून या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ ला विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे, तर पेट परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली जाणार असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०२४ असून प्रवेश अर्ज, पात्रता, नोंदणी, शुल्क आणि नियम अनुषंगिक माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in आणि https://uomllmcet.formsubmit.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ असून या परीक्षेचा तपशील मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर www.mu.ac.in आणि https://uompet2024.formsubmit.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित होणाऱ्या ऑनलाइन पेट परीक्षेसाठी ७६ विषय असून, मागील पेट परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी साधारणत ५ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यात या परीक्षेचे आयोजन केले जाणार असून ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट पेट आणि एलएलएम परिसक्षेसाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.