गोंदिया : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि.५) जाहीर झाला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९५.२४ टक्के लागला होता. यंदा त्यात १ टक्क्याने घट झाली असली तरी नागपूर विभागात जिल्ह्याने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा टोपेशकुमार बिसेन ही 96.13(578) टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. तसेच ऋषभ गजानन गभणे 96.17(577), सुमित तुलाराम हेमने 95.67(574) जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय आलेले आहेत.
फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील एकूण १७९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी १७९०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एकूण १६८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ९४.०४ टक्के आहे. तर निकालात मुलीच सरस ठरल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला एकूण ९२१४ विद्यार्थी तर ८६९४ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ८४५६ विद्यार्थी व ८३८५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.७७ तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.४४ टक्के आहे. जिल्ह्यात शहरीभागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचा निकाल सरस आहे. जिल्ह्यात तिरोडा तालुका बारावीच्या निकालात टॉप ठरला आहे. गोंदिया तालुक्याचा निकाल ९४.४२ टक्के, आमगाव ९२.०९ टक्के, अर्जुनी मोरगाव ९६.९८ टक्के, देवरी ९३.८८ टक्के, गोरेगाव ९१.६० टक्के, सडक अर्जुनी ८६.५१ टक्के, सालेकसा ९५.६१ टक्के, तिरोडा तालुक्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला असून हा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.