33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक आयटीआय प्रवेश वेळापत्रकात मोठा बदल

आयटीआय प्रवेश वेळापत्रकात मोठा बदल

0
50

blank

दहावीचा निकाल लागला आणि साऱ्या घराघरात सध्या करिअरच्या नव्या वळणावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे.थेट कामाचं कौशल्य आत्मसात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच पार्श्वभूमीवर, अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा लागलेल्या असतात त्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेवर. यंदा मात्र, आयटीआयच्या प्रवेश वेळापत्रकात थोडा बदल झाला असून, या बदलामुळे विद्यार्थ्यांना थोडीसाच नव्हे, तर खूपसा दिलासा मिळालाय.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानं नुकतंच आयटीआय प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. याआधी ३० जूनला जाहीर होणारी प्राथमिक गुणवत्ता यादी आता दोन दिवस आधी म्हणजे २८ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसंच अंतिम गुणवत्ता यादीसाठीची तारीखही पुढे न ढकलता, दोन दिवस आधीच १ जुलै रोजी समोर येणार आहे. या वेळापत्रकातल्या बदलामुळं संपूर्ण प्रवेश प्रक्रिया थोडी लवकर सुरू होणार असून, विद्यार्थ्यांचा अनाठायी ताण कमी होणार आहे.

१५ मेपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळालाय. जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आपला अर्ज पूर्ण करून शुल्कही भरलेलं आहे. हे पाहता, यंदाही आयटीआयच्या अभ्यासक्रमांना मोठी मागणी असणार, यात शंका नाही.आता पुढचं चित्र स्पष्ट आहे – २८ जून रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी येणार, त्यानंतर दोन दिवसात हरकती सादर करता येणार, आणि १ जुलैला अंतिम यादी घोषित होणार. ७ जुलैपासून पहिल्या प्रवेश यादीच्या आधारावर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी अशा प्रवेश फेऱ्या नियोजित वेळेनुसार पार पडणार आहेत. अगदी शेवटी, ११ ऑगस्ट रोजी संस्थात्मक स्तरावर समुपदेशन फेरी घेण्यात येईल ज्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी मिळणार आहे.

blank