शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू गैरप्रकार टाळण्याचे आवाहन
वाशिम,दि.७ मे– सर्वोच्च न्यायालय येथे दाखल रिट याचिका क्र. १३२/२०१६ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. ८/१०/२०२४ नुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गतच्या समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमातील २,५७२ विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) योजने अंतर्गतचे पात्र ३५८ विशेष शिक्षक आणि अपंग एकात्म शिक्षण (प्राथमिक स्तर) योजने अंतर्गत माध्यमिक युनिटवरील वर्ग झालेले ५४ विशेष शिक्षक अशा एकूण २,९८४ विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
विशेष शिक्षकांचे समायोजनाची कार्यवाही पारदर्शक पध्दतीने आणि विहित प्रशासकीय कार्यपध्दतीचा अवलंब करून शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे स्तरावर सुरू आहे.
समायोजनाच्या या प्रक्रीयेबाबत ज्या विशेष शिक्षकांना लाभ दिला जाणार आहे, अशा विशेष शिक्षकांना किंवा त्यांच्या संबधीतांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जात असेल तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचेमार्फत करण्यात येत आहे. याबाबत कोणताही गैरप्रकार / गैरव्यवहार आपले निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे: ([email protected]), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ([email protected] / [email protected]) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी. असा कोणताही गैरप्रकार / गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.
असे शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)प्राथमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.